तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांच्या ‌‘शाहिरी परंपरा' या कार्यक्रमाने उपस्थित रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवले.

शाहीर रामानंद उगले यांनी गोंधळ, वासुदेव, भजन आणि भारुड या पारंपरिक कलारूपांतून समाजजागृतीपर संदेश दिले. संतती नियमन, शिक्षण, आरोग्य या महत्वाच्या सामाजिक विषयांवर त्यांनी रंजक पद्धतीने प्रबोधन केले. याचबरोबर आपल्या शाहिरी पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा थोर इतिहास श्रोत्यांसमोर उलगडला. कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

या कार्यक्रमात नारीशक्तीचा गौरव म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते सारिका रामेश्वर येळेकर यांचा सन्मान करण्यात आला. देवींची प्रतिमा, कवड्याची माळ, महावस्त्र आणि अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सारिका येळेकर यांनी एका शेळीपासून शेती आणि दुग्धव्यवसायाची वाटचाल सुरू करून आज तब्बल 37 शेळ्यांचा व्यवसाय उभा केला आहे. यासोबतच त्यांनी पीठाची गिरणी, मिरची कांडप यांसारखे लघुउद्योग सुरू करून स्वावलंबी जीवन जगण्याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा सत्कार तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे यांनी केला, तर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांचा सत्कार उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांनी केला. शाहिरी रंग, समाजजागृतीचे सूर आणि नारीशक्तीचा गौरव अशा बहारदार संगमाने शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाचा आजचा दिवस संस्मरणीय ठरला.


 
Top