भूम/धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यात रविवारी दि. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नद्यांना आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतातील उभे पीक सारेच वाहून गेले. प्रशासनाने पुरात ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना सोमवार दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता हेलिकॉप्टर व बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलविले आहे. 

 पावसामुळे अनेक नद्यांना मोठया प्रमाणात पाणी आले आहे. यातच रविवारी दि. 21 सप्टेंबर रोजी रात्री पाच तास परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्वच नद्यांना महापूर आला आहे. पुराच्या वेढयात अडकलेल्या लाखी, रुई, दुधी, वडनेर, देवगाव, ढगपिंपरी, बावची येथील 35 नागरिकांना आर्मी व आपत्ती व्यवस्थापन टीमने 23 लोकांना हेलिकॉप्टरने तर 18 लोकांना बोटीने सुरक्षीत स्थळी हलविले आहे. यामध्ये तालुक्यातील पांढरेवाडी प्रकल्प शंभर टक्के भरल्याने खैरी नदीला महापूर आला. त्यामुळे शेळगाव जवळील शाळेसह परिसरातील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. तर शंभर टक्के भरलेल्या खासापूरी प्रकल्पातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने उल्का नदीला महापूर आल्याने वडनेर, देवगाव येथील नसराळे, चौधरी वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. तेथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. चांदणी नदीला पुर आल्याने सिरसाव येथील पुरातन महालक्ष्मीच्या मंदिराच्या परिसरासह जवळील घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने मोठे नुकसान झाले. चांदणी व उल्का नद्याचा संगम होवून दोन्ही नदया एकत्र वाहू लागल्याने आवरपिंपरी जवळील एक हॉटेल पाण्याखाली गेले. महापूरामुळे नदी काठावरील घरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकात अनेक फुट पाणी जमा झाले आहे. शेतातील उभे पिके, शेत जमीन वाहून गेली आहे. महापूरामुळे परंडा - बार्शी, परंडा - कुर्डूवाडी रस्ता बंद आहे. तर सीना - कोळेगाव प्रकल्पातून 51 हजार 960 क्युसेक ने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


पहाटेपासून आर्मीची टीम

भूम, परंडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक लोक पाण्यात अडकल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाली. त्यानंतर आर्मीची एक टीम, एनडीआरएफची एक टीम भूम, परंडा परिसरात येवून 35 लोकांना हेलिकॉप्टर व बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलविले. शारदीय नवरात्र महोत्सवामुळे अपर जिल्हाधिकारी यांची या भागावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती केली आहे. या भागातील सर्व धरणे भरल्यामुळे नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. 

किर्ती किरण पूजार, जिल्हाधिकारी, धाराशिव

 
Top