वाशी (प्रतिनिधी)- फैजाने रजा मस्जिद, आदर्श नगर वाशी तसेच मुस्लिम समाज आणि जीव रक्षा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सर्वधर्मीय 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली कर्तव्यनिष्ठा बजावली.
या वेळी गावातील सर्व मान्यवर राजकीय नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, गावकरी बांधव, मुस्लिम समाजातील कार्यकर्ते, जीव रक्षा ग्रुपचे सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व आदरणीय डॉक्टर व त्यांचे सहकारी, पत्रकार बंधू तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवरांनी मोहंमद पैगंबर यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले
या निमित्ताने केवळ रक्तदानच नव्हे, तर मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. याच निमित्ताने 1500 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोकांना किमान एक तरी झाड आपल्या घराच्या अंगणात लावावे असा संदेश दिला. त्यानंतर झाडांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाची ग्वाही देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जीव रक्षा ग्रुपचे सदस्य , वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या सामाजिक उपक्रमातून मानवतेचा, पर्यावरण संवर्धनाचा, रक्तदानाचा आणि एकतेचा संदेश समाजामध्ये पोहोचला असून गावकऱ्यांनी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहभाग नोंदवला. या कार्यक्रमामध्ये फैजाने रजा मस्जिद व कमिटी व मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
