धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील नगरोत्थान महाअभियानातील 140 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकल्पातील अडथळ्यांवर अखेर हालचालीला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना आठ दिवसात फेरनिविदा काढून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन दिल्यावर माध्यमाशी बोलताना त्यांनी असे आदेश दिले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि मकरंद राजेनिंबाळकर उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून दिलेल्या निवेदनात म्हटले की, नगरोत्थान योजनेअंतर्गत 140 कोटी रुपयांचा निधी 23 फेब्रुवारी 2024 रोजी मंजूर होऊनही रस्ते कामास सुरुवात झाली नाही. नियमाप्रमाणे सात दिवसांत निविदा काढून तीन महिन्यांत काम सुरू होणं अपेक्षित होते. परंतु 8 ते 28 मार्च 2024 पर्यंतची मुदत असूनही निविदा उघडली गेली नाही. सहा जानेवारी 2025 रोजी महाविकास आघाडीने रास्ता रोको आंदोलन केले. नंतर नगरपरिषदेकडून फेब्रुवारी अखेर काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले. 25 जानेवारी 2025 रोजी निविदा उघडली गेली, मात्र कंत्राटदाराने अंदाजपत्रकापेक्षा 15 टक्के जादा दराची मागणी केली.

नगरपालिकेने आश्वासन देऊनही काम सुरू न झाल्याने 28 एप्रिल 2025 रोजी महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी 30 एप्रिल रोजी उपोषणस्थळी भेट देऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. पण दोन मे रोजी फेरनिविदेचे पत्र नगरपरिषदेला मिळूनही 12 जून 2025 रोजी निविदा रद्द झाल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. तीन महिने उलटले तरी कोणताही निर्णय झाला नव्हता.

या प्रदीर्घ विलंबामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून सर्वत्र खड्ड्यांमुळे नागरिक, महिला, मुले आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरील सहा महिन्यांपासूनची स्थगिती तातडीने उठवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. महाआघाडीने इशारा दिला होता की, रस्ते प्रकल्प तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सरनाईक यांनी पंधरा दिवसात फेरनिविदा काढून काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश देत कामाला गती देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

यावेळी प्रशांत पाटील,प्रवीण कोकाटे, रवि वाघमारे,अग्निवेश शिंदे,सोमनाथ गुरव,आयाज शेख,उमेश राजेनिंबाळकर,राजाभाऊ पवार,सिद्धार्थ बनसोडे,राणा बनसोडे, धनंजय राऊत,बिलाल कुरेशी,सतीश लोंढे, संदीप शिंदे, संभाजी दळवी, सत्यजित पडवळ, अशोक पेठे, संजय गजधने,हर्षद ठवरे,सह्याद्री राजेनिंबाळकर,अक्षय जोगदंड,अजिंक्य राजेनिंबाळकर त्यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते. 

 
Top