धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी दि.26 सप्टेंबर रोजी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या एका रात्रीत तब्बल 125 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात अनेक रस्त्यावर पाण्या आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. तर रेड अलर्टमुळे शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
विशेषतः भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असून, नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गावोगावी पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले असून, काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेत पुणे येथून एनडीआरएफच्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत. या पथकांकडून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मागील दोन दिवसात काही प्रमाणात पाणी ओसरले होते. मात्र, भूम व परंडा तालुक्यातील शेतजमिनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्या आहेत. धाराशिव तालुक्यातील आरणी येथील दुध घेवून जाणारे काही लोक नदीतून जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत जावू लागले तेव्हा लोकांनी त्यांना वाचविले.
मागील पावसातून काही प्रमाणात राहिलेल्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात एकाच रात्रीत सर्वदूर 125 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या पावसामुळे परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथील लोकांचे स्थलांतर केले आहे. परंडा तालुक्यातील जवळपास 1 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातील शहापूर, दैठणा येथील पुलावर पाणी आल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. शनिवारी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भेट दिली. दैठणा गावात शुक्रवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन जनावरे वाहून गेली. त एक जनावर वीज पडून मृत झाले. भूम तालुक्यातील पांढरेवाडी येथील संगमेश्वर सिंचन प्रकल्पातील विसर्ग लक्षात घेता आणि मांजरा नदीची पाणी पातळी वाढत असल्याने नदी पात्रा लगत असलेल्या 25 कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. तर धाराशिव तालुक्यातील बेंबळी- बोरखेडा, काजळा व कळंब तालुक्यातील गोविंदपूर-खामसवाडी येथील पुलावरून पाणी चालल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.
हा धोका आजही कायम असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे आणि गोठे पाण्यात बुडाले असून, जनावरांचेही मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, आपत्कालीन पथके आणि स्थानिक स्वयंसेवक युद्धपातळीवर कार्यरत आहेत. महाराष्ट्रात सरासरी आज पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात विक्रमी पाऊस कोसळत असून, महाराष्ट्रात सरासरीच्या सर्वाधिक 160 टक्के पाऊस धाराशिव जिल्ह्यात पडला आहे.