धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने धाराशिव, लोहारा आणि औसा तालुक्यातील गावांसाठी महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती कामासाठी तब्बल 113 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. सोमवारी दि. 11 ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. अशी माहिती मित्र चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
सलग तीन वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या कामामुळे धाराशिव, लोहारा आणि औसा तालुक्यातील 23 गावातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अशक्यप्राय वाटणाऱ्या या दुरुस्तीच्या कामासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची अभूतपूर्व तरतूद केली. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या योजनेतील स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकीकरणाची कामे आता लवकरच सुरु होत आहे. पाच टप्प्याची असणारी ही योजना मागील अनेक वर्षे बंद आहे. त्यामुळे स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शिवारात लवकरच निम्न तेरणेचे पाणी खळाळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
उपसा सिंचनसाठी 46.97 दलघमी पाणी राखीव
माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे तेव्हाच आपल्या हक्काचे 46.97 दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यात आलेले आहे. या योजनेत स्थापत्य विभागासाठी 52.51 कोटी, यांत्रिकी विभागासाठी 43 कोटी 17 लाख आणि विद्युत विभागातील दुरुस्तीसाठी 17.84 कोटी अशा एकूण 113 कोटी 53 लाख रुपयांची तरतूद केली आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.