धाराशिव (प्रतिनिधी) - तत्कालीन प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांनी ओबीसींच्या आरक्षणासाठी मंडल आयोग लागू केला. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी त्यांचा पाठिंबा काढून घेत सिंग यांचे सरकार पाडले. तर माजी केंद्रीय मंत्री व भाजप प्रमुख लालकृष्ण अडवाणी यांच्या माध्यमातून आम्हाला मंडल नको म्हणत कमंडल यात्रा काढून त्यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता. तसेच आता राज्यामध्ये मंडल यात्रा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बंडल यात्रा असल्याचे म्हणत पुन्हा एकदा ओबीसी समाज व आरक्षणाचा अपमान केला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी मंडल यात्रेचा आदर करावा, असे आवाहन राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी दि.२५ ऑगस्ट रोजी केले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्यावतीने दि.९ ऑगस्टपासून ओबीसी आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी मंडल यात्रा धाराशिव शहरात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, पक्षाचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश रेणके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना राजापूरकर म्हणाले की, मंडल आयोगाची सर्वप्रथम अंमलबजावणी शरद पवार यांनी महाराष्ट्रात केली त्यामुळे ते मंडल आयोगाचे जनक असल्याचे त्यांनी सांगितले. तर मंडल यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून मुंबई येथे दि.२९ ऑगस्ट रोजी पोहोचणार आहे. मात्र, या यात्रेच्या मार्गात सत्ताधाऱ्यांनी अडचणी निर्माण करीत या यात्रेचे मार्ग बदलण्यात आले. विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरी हे यात्रा संपूर्ण राज्यात जाणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत कोणत्या समाजाची टक्केवारी किती आहे ? हे समजणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर जात निहाय जनगणना करावी असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची प्रांजळ इच्छा आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असे सांगत ते म्हणाले की, आरक्षणाचा विषय राज्य सरकारचा नसून तो केंद्र सरकारच्या कक्षेत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बसून चर्चा करून मराठा आरक्षणाबाबत कायदा करावा, असे आवाहन त्यांनी केले. तर ज्यांची जात वैधता प्रमाणपत्र आहेत अशांना निवडणुकीसाठी आमचा विरोध नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सक्षणा सलगर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले ते त्यांच्याकडून भाषणाच्या ओघात झाले असल्याचे सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
