कळंब (प्रतिनिधी)- “सर, मला गणपतीचा हात बनवून द्या ना!“, “माझ्या गणपतीची सोंड बरोबर आहे ना ताई?“, “अरे देवा, उंदीरमामा राहिलाच की!“ अशा निरागस प्रश्नांनी आणि उत्साहाने डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे पटांगण दुमदुमून गेले होते. निमित्त होते, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या वतीने आयोजित 'आपला गणपती आपण बनवूया' या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे. या कार्यशाळेत 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी शाडू मातीच्या सुबक गणेशमूर्ती साकारल्या.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण आणि मूर्तींची विटंबना रोखण्यासाठी लहान मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कपड्यांवर आणि गालावर माती लागली तरी त्याची पर्वा न करता मुले मूर्ती बनवण्यात तल्लीन झाली होती.
यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष डॉ. अभिजित जाधवर, सचिव श्याम जाधवर, प्रकल्प संचालक रवि नरहिरे व डॉ. सचिन पवार, रोटेरियन संजय देवडा, धर्मेंद्र शहा, निखिल भडंगे, सचिन डोलारे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशिक्षक भोले सर व कु. विशाखा लिमकर यांनी विद्यार्थ्यांना गणपती बनवण्याचे सोप्या भाषेत प्रशिक्षण दिले. मुलांच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे देत आणि त्यांच्या चुका दुरुस्त करत त्यांनी अत्यंत संयमाने मार्गदर्शन केले. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या अखेरीस, मुलांनी स्वतः तयार केलेल्या मूर्ती घरी नेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. हा आनंद पाहून शिक्षक आणि पालकांच्या चेहऱ्यावरही समाधान फुलले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक पोपट निकम, सहशिक्षक प्रदीप यादव, सज्जन बर्डे, किशोर वाघमारे, रमेश अंबिरकर, नामदेव झाडे, सुरज राऊत व शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नैसर्गिक रंगांचा वापर करा
पर्यावरणपूरक गणपती म्हणजे फक्त शाडू मातीची मूर्ती नव्हे. अनेकदा मूर्ती शाडूची असली तरी त्यावर रासायनिक ॲक्रेलिक रंग वापरले जातात, जे पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे मूर्ती तयार झाल्यावर तिला रंगवण्यासाठी गेरू, हळद, कुंकू, बुक्का, चंदन अशा नैसर्गिक रंगांचा वापर करावा. हे रंग मूर्तीला चिकटवण्यासाठी फेव्हिकॉलऐवजी नैसर्गिक डिंकाचा वापर करणे योग्य ठरते.
- विशाखा लिमकर, प्रशिक्षक
बालवयातच पर्यावरण रक्षणाचे संस्कार
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सुरुवात बालवयातच होणे आवश्यक आहे. 'आपला बाप्पा आपण बनवूया' यासारख्या कार्यशाळांमधून मुलांना पर्यावरणाचे महत्त्व कळते आणि त्यांच्यात एक चांगली सवय रुजते. हळूहळू या आवडीचे सवयीत रूपांतर होऊन एक पर्यावरणपूरक संस्कृती तयार होईल, याच उद्देशाने आम्ही ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
- रवी नरहिरे, प्रकल्प संचालक, रोटरी क्लब.