तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील काटगाव शिवारात विद्युत मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या टोळीला काही स्थानिकांकडून सहाय्य मिळत असल्याचेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

शनिवार रोजी काटगाव येथील शेतकरी लहु नागनाथ रेवगे यांची सबमर्सिबल पंप मोटार कोठ्यातून दुपारी चार वाजता चोरी झाली. सुगावा लागल्याने शेतकऱ्यांनी चोराचा पाठलाग करून इटकळ येथे तो विक्री करताना पकडला. मात्र, चोरांना मदत करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही लोकांनी शेतकऱ्यांवर दबाव आणून प्रकरण तेथेच थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मागील आठवड्यात काटगाव भागातून 15 ते 20 विद्युत मोटारी चोरीला गेल्याच्या तक्रारी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे की, आरोपी व त्यांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. तसेच, दबाव आणणाऱ्यांवरही गुन्हा नोंदवावा, अन्यथा भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.

 
Top