धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकारने तुळजापूर शहर व श्री तुळजाभवानी मंदिर व परिसर विकास आराखडा हाती घेतला असून या आराखड्यातून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,असे आश्वासन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक शफकत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख, श्री तुळजापूर मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार अरविंद बोळंगे,मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,पुजारी मंडळाचे बिपीन शिंदे, धीरज पाटील तसेच विस्थापित होणारे काही नागरिक यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, तुळजापूर हे धार्मिक,सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे.दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा,रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे ही काळाची गरज आहे.असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, मंदिर विकास आराखडा हा केवळ दगड,सिमेंट व इमारतींच्या उभारणीपुरता मर्यादित नसून तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवणारा असेल.स्थानिक नागरिक,व्यापारी,सेवेकरी व भाविक यांचे हित जोपासूनच विकासकामे राबवली जातील. कोणत्याही कुटुंबाचे नुकसान होईल असा निर्णय घेतला जाणार नाही.विकास आराखड्यामुळे रोजगार निर्मिती,पर्यटन वाढ,व्यापार वृद्धी आणि सोयी-सुविधांचा दर्जा उंचावेल,असे त्यांनी यावेळी नमूद केले.
श्री तुळजाभवानी मंदिर हा महाराष्ट्राच्या जनतेच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.त्यामुळे मंदिर परिसरातील सौंदर्यीकरण,वाहतूक व्यवस्थापन,निवास व भोजनाची योग्य व्यवस्था,स्वच्छता व पर्यावरण संतुलन या गोष्टींवर विशेष भर देण्यात येणार आहे.भाविकांना त्रास होणार नाही आणि स्थानिकांचा व्यवसाय अबाधित राहील यासाठी नियोजनात लवचिकता ठेवण्यात येईल,असेही पालकमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.