धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला ठोस निर्देश देत शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक भूमिका घेतली.“शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही पुढील व्यवहार करण्यात येऊ नये,“ असे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आजच्या या बैठकीला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, गेल्या काही काळात पवनचक्की प्रकल्पासाठी जमिनीचे व्यवहार करताना शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे, करारपत्रांमध्ये त्रुटी ठेवणे किंवा अटी अस्पष्ट ठेवणे अशा अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून,त्यांना आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की,“शेतकरी हा या व्यवहारातील मुख्य घटक आहे.त्याला फसवले जाऊ नये याची हमी प्रशासनाने घ्यावी.पवनचक्की कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय राखणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली यासाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. ही समिती शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी,नोंदणी प्रक्रिया तसेच पवनचक्की कंपन्याकडून होणाऱ्या पुढील व्यवहारांचे नियमन करेल.कोणताही करार पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे सर्व हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत,अशी अट घालण्यात आली आहे.
पालकमंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की,जिल्ह्यातील विकासकामांसाठी गुंतवणूक होणे महत्त्वाचे आहे,मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचे हक्क गमावले जाऊ नयेत.पवनचक्की प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती आणि वीज उत्पादनाला चालना मिळणार असली,तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे. बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली.