धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी भाई उद्धवराव पाटील यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साही वातावरणात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पक्षाचे संस्थापक स्व. भाई उद्धवराव पाटील व स्व. भाई नरसिंगराव देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पक्षाचा लाल बावटा अभिमानाने फडकावण्यात आला. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव गवाड, ॲड. अविनाश देशमुख, धनंजय उद्धवराव पाटील, हणमंतराव उर्फ बुवा देशमुख, बालाजी तांबे, प्रा. रवी सुरवसे, प्रा. राहुल पाटील, प्रा. आदित्य धनंजय पाटील, कुरुलकर, विनय देशमुख, ॲड. अनिकेत देशमुख आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाई उद्धवराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत आणि शिक्षण, सहकार व समाजकारण क्षेत्रात प्रभावी कार्य करणारे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी 1948 साली शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून ग्रामीण, शोषित आणि श्रमिक वर्गासाठी संघर्षाला दिशा दिली. “शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा“ ही त्यांची ठाम भूमिका होती. त्यांनी रयत शिक्षण संस्था आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून शिक्षण व स्वावलंबनाची मुहूर्तमेढ रोवली.
वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. नव्या पिढीने भाई पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. समतेवर आधारित, मूल्यनिष्ठ राजकारण आणि शोषणविरहित समाजरचनेसाठी सज्ज राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला.