धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील दाऊतपूरमध्ये एका 55 वर्षीय व्यक्तीने पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरूध्द ढोकी पोलिस ठाण्यात 4 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परमेश्वर गुलाब गडदे  (वय 55, रा. दाऊतपूर, ता. जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 8 जुलै 2025 रोजी राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपवले होते. याबाबत मयताची मुलगी ऋतुजा विष्णू बंडगर (वय 24, रा. लांबोटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी 4 ऑगस्ट 2025 रोजी ढोकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार मयत परमेश्वर यांची पत्नी रेखा परमेश्वर गडदे आणि चांगदेव नामदेव थोरात (दोघे रा. दाऊतपूर) यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे दोघे मिळून परमेश्वर यांना सातत्याने मानसिक त्रास देत होते. इतकेच नव्हे तर पत्नी रेखाने घरातील सर्व पैसे प्रियकर चांगदेव याला दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून परमेश्वर गडदे यांनी अखेर आत्महत्येचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

ऋतुजा बंडगर यांच्या तक्रारीवरून ढोकी पोलिसांनी आरोपी रेखा गडदे आणि चांगदेव थोरात यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108, 352, 351 (2), 351 (3), आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 



 
Top