धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील कळंब व वाशी तालुक्यात मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने व नदी नाल्यांना व ओढ्यांना पूर आल्याने शेतात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची गुरढोरे वाहून गेली. तर एक शेतकरी देखील या पुरामध्ये वाहून गेला आहे. त्याचा अद्याप ठाव ठिकाणाला लागला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पिकासह खरवडून गेल्या आहेत. या नुकसानीची पाहणी राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केली असून त्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, मागील दोन दिवसात कळंब व वाशी तालुक्यात मांजरा व तेरणा नद्यांना मुसळधार अतिवृष्टीमुळे पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 168 मिलिमीटर हून अधिक पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत राज्य सरकारने कोणत्याही जाचक अटी न लावता सरसकट सर्व मंडळात अतिवृष्टी जाहीर करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी. असे सांगून आमदार पाटील यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीबाबत जाचक अटी व शर्थी लादल्या आहेत. असे सांगून पिक विमा योजनेमध्ये देखील बदल केले असून चारही ट्रिगर काढून टाकले आहेत. 


जाचक अटी

सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पिक विमा योजनेमध्ये ई पिक पाहणीची अट घातली आहे. परंतु ई पिक ॲप चालत नाही. नेहमीच सर्वर डाऊन असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ॲपवर नोंदणी करता येत नाही. अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई मध्ये देखील राज्य सरकारने हेक्टरी कपात केली आहे. नुकसानीच्या मदतीबाबत जाचक अटी व शर्ती लादल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. असे सांगून आमदार पाटील यांनी सरकारने पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. अशी भूमिका आपण सरकार व कृषीमंत्र्यांसमोर मांडली आहे.  जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत न केल्यास शिवसेना ठाकरे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला या पत्रकार परिषदेत दिला आहे.

 
Top