धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा (ता. धाराशिव) येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना केवळ 24 तासांच्या आत जेरबंद करण्याची धडाकेबाज कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ही कारवाई गुरूवार दि. 14 ऑगस्ट रोजी पहाटे 3.30 वाजता करण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस ठाणे बेंबळी हद्दीत गुरनं 209/2025 भादंवि कलम 103, 3(5) बीएनएस अंतर्गत नोंद झालेल्या संवेदनशील दुहेरी हत्याकांडानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोना. बबन जाधवर, अशोक ढगारे, चापोह. विजय घुगे आणि महेबुब अरब हे पथक रवाना झाले.
दरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जीवन हरीबा चव्हाण, हरीबा यशवंत चव्हाण हे दोघे पुण्यातील नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले असल्याचे कळाले. तातडीने वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने सरकारी वाहनांद्वारे पुण्याकडे रवाना होऊन जनता वसाहत, पर्वती पायथा येथे छापा टाकला. अत्यंत शिताफीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव येथे आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना रिपोर्टसह पोलीस ठाणे बेंबळी येथे सुपूर्द करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.