धाराशिव (प्रतिनिधी)- जमिनीच्या वादातुन जुन्या भांडणाची कुरापत काढून पती पत्नीचा निर्घृण खुन केल्याची घटना बुधवार दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात घडली आहे. सहदेव व प्रियांका पवार या पती पत्नीचा निर्घृण खुन करण्यात आला आहे. सुरुवातीला गाडीने धडक देऊन नंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. आरोपी जीवन चव्हाण, हरिबा चव्हाण या बाप लेकासह अन्य जणांनी मिळून हे हत्याकांड केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सहदेव हे 15 दिवसापूर्वीच जामीनावर बाहेर आले होते.
आरोपी व मयत सहदेव यांचा जमिनीचा वाद होता. त्या वादातुन सहदेव याच्यावर 307 चा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांना 4 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यानंतर गेली अनेक वर्ष सहदेव हे जेलमध्ये होते. त्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना गेल्या 15 दिवसापुर्वी जामीन मंजुर केला होता. त्यानंतर ते गावात आले. नंतर पूर्वीचा वाद यातून बदला घेण्यासाठी पती पत्नीची हत्या करण्यात आली. सहदेव यांच्यावर जवळपास 10 वार करण्यात आले असून पती पत्नीच्या हत्यानंतर त्यांची पहिली व तिसरीला असलेल्या 2 मुली पोरक्या झाल्या आहेत.
तर सहदेव यांना गंभीर जखमी अवस्थेत धाराशिव येथील रूग्णालयात आणले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्यासह पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.