धाराशिव (प्रतिनिधी)- सरसकट कर्जमाफी मागणीचा 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत ठराव घ्यावा,जिल्ह्यातील सर्व ठराव एकत्र करून ते मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावून हा ठराव घ्यावा असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.
आमदार पाटील म्हणाले की, 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने सामूहिक निवेदन करून शासनाला कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून द्यायची आहे. निवडणूकीत सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व तेव्हाच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. पण तीन अधिवेशने होवून ही या विषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांचे भाव हमीभावापेक्षा कमी मिळत असून, उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव ,योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकारांकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे नोटिसा, जप्ती कारवाई, काहींकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहेत. दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमाफी हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. ही कर्जमाफी सर्व प्रकारच्या कर्जांवर, यामध्ये थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीककर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलिहाऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करावा. समिती, निकष व अभ्यास यामध्ये वेळ न घालवता सरकारने तातडीने कर्जमाफी करावी अशा प्रकारचा ठराव शेतकऱ्यांनी ग्रामसभेत मांडावा असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
या आहेत मागण्या
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. कर्जमाफीची अंमलबजावणी बिनशर्त, पारदर्शक व त्वरित करावी. कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन शाश्वत शेती धोरण लागू करावे. आपण तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील शेतकरी वर्गाला कर्जमाफीचा दिलासा द्यावा.