धाराशिव (प्रतिनिधी)- केळीच्या विविध जाती लागवडीचे तंत्रज्ञान रोग,किडणीचे व्यवस्थापन,शिक्षण व प्रशिक्षण या दृष्टीने अभ्यास आणी उपाय योजना करण्यासाठी केळी संशोधनाची गरज आहे त्यासाठी परांडा जि. धाराशिव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करावे अशी मागणी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी  राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री,कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे.

धाराशिव जिल्हा हा शेतीप्रधान असून येथे केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. अनुकूल हवामान, सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी यामुळे या भागातील केळी उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण उल्लेखनीय आहे.परंतु केळी लागवडीत नवीन वाणांची निर्मिती, कीड-रोग नियंत्रण, उत्पादनवाढ व आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्यातक्षम उत्पादन याबाबत मार्गदर्शन देणारे स्वतंत्र केळी संशोधन केंद्र येथे उपलब्ध नाही. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, विपणन व्यवस्था आणि रोगनियंत्रणाबाबत वेळेवर व स्थानिक पातळीवर मदत मिळत नाही.त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र तातडीने स्थापन करण्याची मागणी करण्यात येत आहे. हे केंद्र स्थापन झाल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, नफा वाढेल आणि जिल्ह्याची कृषी अर्थव्यवस्था बळकट होईल.


 
Top