तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील जयभारत तरुण मंडळाने श्रीगणेशोत्सवात आपल्या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना चक्क प्राचीन दगडी विहिरीतील पाण्यात केली आहे.
या नैसर्गिक व अनोख्या देखाव्यामुळे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष या मंडळाकडे वेधले गेले आहे. यंदा झालेल्या प्रचंड पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली प्राचीन कोटाची विहीर पाण्याने काठोकाठ भरली असून, विहिरीतील दगडी कमानीतच श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. याच विहिरीतील पाण्याचा वापर करून धबधब्याचा देखावा साकारण्यात आला आहे. रात्री लाईटिंगच्या सजावटीमुळे हा धबधबा अधिकच आकर्षक दिसतो. त्यामुळे भक्तांसाठी आणि पाहुण्यांसाठी हा उत्सव विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.