धाराशिव (प्रतिनिधी)- गावठाण हद्दीबाहेरील जागा गावठाण हद्दीत असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन खरेदीखत केल्याच्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दिलेला आदेश कायम ठेवत वरवंटी गावच्या सरपंच विमल शिवाजी देशमुख यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा आदेश पारित केला आहे.

या प्रकरणातील तक्रारकर्त्यांचे वकील ॲड. एम. व्ही. मैंदाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथील सरपंच विमल शिवाजी देशमुख व उपसरपंच यांनी गावातील प्लॉट गावठाण हद्दीत येत नसताना, गावठाण हद्दीत येतो असे प्रमाणपत्र दिल्यामुळे गावातील प्लॉटचे बेकायदेशीर खरेदीखत झाले म्हणून वरवंटी येथील मयुर अंकुश गायकवाड यांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत सरपंच व उपसरपंच यांनी चुकीचे गावठाण हद्दीचे प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच व उपसरपंच यांना अपात्र करावे असा अहवाल विभागीय आयुक्त यांचेकडे सादर केला. या प्रकरणाची सुनावणी होवून सरपंच व उपसरपंच यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषीत केले. त्यानंतर सरपंच विमल शिवाजी देशमुख यांनी सदर आदेशाच्या विरुध्द राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले. सदर अपिलाच्या सुनावणीत तक्रारदार मयुर अंकुश गायकवाड यांचे वकिल ॲड. एम. व्ही. मैंदाड यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंच विमल शिवाजी देशमुख यांचे अपिल 6 ऑगस्ट 2025 रोजी नामंजूर करत विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम केला. त्यामुळे विमल शिवाजी देशमुख यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

 
Top