धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी ई-केवायसी मोहिम राबविण्यात येत आहे.याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच घेण्यात आली.

सध्या जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण 23 लाख लाभार्थी असून त्यापैकी 6.43 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. योजनेतून लाभार्थींना प्रति कुटुंब प्रतिवर्षी 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा 1356 आजारांवर मिळणार आहेत. जिल्ह्यातील 25 खाजगी व 12 शासकीय रुग्णालये अशा एकूण 37 रुग्णालयांमध्ये उपचारांची सुविधा उपलब्ध असून महाराष्ट्रभर सुमारे 2300 रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत.

लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र, केंद्र, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मोफत सेवा उपलब्ध होणार आहे.तसेच 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विशेष ‌‘आयुष्मान वय वंदना कार्ड' काढण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही विशेष मोहिम 4 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान राबविण्यात येणार असून गाव,वाडी, वस्ती,शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन ई-केवायसी केली जाणार आहे.याशिवाय,लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर आयुष्मान ॲप डाऊनलोड करून ‌‘' बटणावर क्लिक करताही ई-केवायसी करू शकतील.जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

“आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांमुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना गुणवत्तापूर्ण व मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनात गावनिहाय नियोजन करून ऑगस्ट 2025 पर्यंत 100 टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक लाभार्थ्याने ही मोहीम गंभीरतेने घेऊन आपले आयुष्मान कार्ड त्वरित काढून घ्यावे,जेणेकरून कोणीही आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही.“असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 
Top