भूम (प्रतिनिधी)- सकाळपासून चालू असलेल्या जोरदार पावसाने भूम तालुक्यातील वाकवड फाटा ते वाकवडगाव दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे. वाकवड गावामध्ये अडीच हजाराच्या आसपास लोकसंख्या असून ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत. वारंवार बांधकाम विभागाकडे पुलाची उंच पुल करण्याचे मागणे ग्रामस्थांमधून होत आहे.

दि. 6 ऑगस्ट रोजी तालुक्यातील वाकवड परिसरात जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने वाकवड फाटा ते वाकवडगाव दरम्यान असणाऱ्या लहान पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावामध्ये शाळेत आलेले विद्यार्थी अडकून बसले. तालुक्याच्या ठिकाणी गेलेले विद्यार्थी व ग्रामस्थ गावामध्ये येताना पाणी असल्यामुळे एका बाजूलाच अडकून बसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये अडचण निर्माण होते. जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे मागील पाच वर्षापासून नवीन पूल उंची वाढवण्यासहीत मागणी केली असताना देखील जिल्हा परिषद बांधकाम विभाग जाणून बुजून या पूल मंजुरीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .पुढील काळात पूल मंजूर करून ग्रामस्थांसाठी  उपलब्ध न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


दरवर्षी पावसाळ्यामध्ये वाकड फाटा ते वाकवडगाव दरम्यान मोठा पाऊस झाल्यास पुलावरून पाणी वाहत असल्यास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अडकून थांबावे लागते. मागील पाच वर्षापासून जिल्हा परिषद बांधकाम विभागात पुल करण्याची मागणी करत आहोत. पुढील काळात पूल न केल्यास आंदोलन करण्यात येईल असे सरपंच अमोल मासाळ यांनी सांगितले.

 
Top