तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील बहुचर्चित तिर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषद निवडणुक आता अगदी दारात येऊन ठेपली आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकांमुळे आधीच तापलेल्या राजकीय वातावरणाला आणखी धग लागणार हे निश्चित आहे. दि. 18 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेनं अनेक इच्छुकांची झोप उडवली आहे. पक्ष व मतदार कुणालासंधी देणार याची उत्सुकता लागली आहे.
31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना आक्षेप नोंदवण्याची संधी आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडण्याची सक्ती आहे. 10 प्रभागातून 20 तर 11 व्या प्रभागातून 3 नगरसेवक असे 23 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागात सरासरी 2800 ते 3400 मतदार असणार आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी चुरशीची लढत ठरेल. महाविकास आघाडीच्या आरोपांच्या फैरीमुळे हादरलेली महायुती पुन्हा ट्रॅकवर आल्याचे चित्र आहे. 1865 कोटींच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याचा मुद्दा भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असण्याची शक्यता आहे. एकंदरीत “तुळजापूर विकास आराखडाच प्रचाराचा आखाडा बनतोय” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.