धाराशिव (प्रतिनिधी)- समाजाचे प्रतिबिंब कवितांच्या माध्यमातून दिसून येत असते, अन्याय अत्याचारावर कोरडे ओढण्याचे काम कविता करते, हारलेल्या थकलेल्यांना नवी उमेद कविता देते, थोडक्यात कविता माणसाला जगण्याचे बळ प्रदान करते असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक साहित्य भारतीचे देवगिरी प्रांतमंत्री युवराज नळे यांनी केले. कवयित्री संध्या पाटील यांच्या 'जयोस्तुते' व 'आणि प्रतिमेला पंख फुटले' या दोन काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती व अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था धाराशिव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलेगाव येथील शिक्षिका संध्या दिनकरराव पाटील यांच्या दोन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जय हिंद विद्यालय कसबे तडवळे येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डायटचे प्राचार्य दयानंद जटनुरे व ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे हे होते. तर विस्तार अधिकारी किशोरी जोशी प्राचार्य हरिदास फेरे साहित्य भारती धाराशिव चे अध्यक्ष भागवत घेवारे कार्यवाह रवींद्र शिंदे जय हिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डायटचे प्राचार्य दयानंद जटनुरे राजेंद्र अत्रे व प्राचार्य हरिदास फेरे यांचेही समायोजित मार्गदर्शन झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलेगावच्या शिक्षिका तथा कवयित्री संध्या पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांचे दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत असल्याबद्दल साहित्य भारती व  बालकुमार साहित्य संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह प्रकाशित होत असल्यामुळे त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून अधिक प्रमाणात साहित्यिक गुण विकसित व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास जगदीश जाकते ऋषिकेश पवार बाळासाहेब जमाले यांच्यासह कोलेगाव ग्रामपंचायत सदस्य गावकरी तडवळे येथील प्रतिष्ठित नागरिक आणि तेरणा नगर बीटचे शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवाजी चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र शिंदे यांनी केले.

 
Top