धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये आपल्या कार्य कुशलतेमुळे ज्यांनी ग्रंथालय शास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले. आणि माहितीच्या परिस्फोटाच्या युगात सुद्धा योग्य पद्धतीने माहिती स्त्रोताचे नियोजन वर्गीकरण पद्धतीने करून वाचकांपर्यंत माहिती पोहोचवली. असे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथ यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये डॉ. रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या अभिवादनाच्या कार्यक्रमाला ग्रंथपाल प्रा.सुनिता गुंजाळ, प्रा.एस जी शिंदे, रामेश्वर मुंढे, सहाय्यक ग्रंथपाल,बी जी सिरसट, डी. आर. जाधव, सविता नलावडे, सूक्षमा टेकाळे, संभाजी धतुरे, हनुमंत सुरवसे आणि इंदुबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने बोलताना म्हणाले की, “वाचाल तर वाचाल!“ हा मंत्र यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. जग किती जरी बदललं तरी वाचनाचे महत्त्व अबाधित राहणार आहे. वाचनाने माणूस संस्कृत बनत. दैनंदिन जीवनामध्ये कितीही व्यस्त असलो तरी प्रत्येकाने दररोज काही ना काही वाचन केले पाहिजे.
याप्रसंगी बोलताना प्रा. सुनीता गुंजाळ- कवडे म्हणाल्या की, मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल असलेले डॉ. एस. आर. रंगनाथ यांचे ग्रंथालयाच्या विकासात अमुलाग्र असे योगदान असून देशातील सर्वसामान्य लोकांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुले करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी केला. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालया मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
