धाराशिव (प्रतिनिधी)- महिन्याभरात तब्बल 23 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. दीड लाख हेक्टरवर पिकास फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा 3 लाख 75 हजार हेक्टरवर असून, हेक्टरी 4 क्विंटलने उत्पादकता घटणार असल्याने 550 कोटींचे पिकांचे नुकसान झाल्याचे तज्ज्ञांचा दावा आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी 770.7 मिमी आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 97.02 टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस अपेक्षेपेक्षा अधिक तर जून व जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाने पेरणी लवकर करून घेतली होती. 5 लाख 68 हजार हेक्टरवर पेरा झालेला आहे. ऑगस्ट महिन्यात पिकेही चांगलीच बहरली होती. मुग, उडदाचे पीक काढणीस तर कोठे शेंगा भरणीच्या अवस्थेत होते. तर सोयाबीन पिकही फुलोऱ्यात होते. चांगले उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र अतिवृष्टीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही पिकांना नद्यांचा पुराचा फटका बसला. शेती पिकांत पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडली आहेत. तर काही ठिकाणची जमिनीच खरडून गेलेली आहे. पंचनामे सुरू आहेत. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची आशा आहे.
सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता 4 क्विंटलने, मुगाची 3 व उडदाची 2 क्विंटलने उत्पादन घटणार आहे. या फटक्यामुळे पेरणीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसामुळे पंधरा दिवसांच्या कालवाधीत 23 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दीड लाख हेक्टर विभागाचा प्राथमिक अंदाज असला तरी हा आकडा अडीच लाखावर जाण्याची शक्यता आहे. 14 ऑगस्टपासून जिल्ह्यात सलग आठवडाभर दमदार पाऊस झाला. याच कालावधीत नद्यांना पूरही आला. याचा अधिक फटका कळंब व वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. सलग तीन दिवस कोसळधारा सुरू असल्याने शिवारात पाणी साचले.
जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यात एकूण 226 सिंचन प्रकल्प आहेत. त्यामध्ये सिनाकोळेगाव एक मोठा प्रकल्प आहे. तर मध्यम 17 प्रकल्प आहेत. लघू 208 सिंचन प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पासह 110 सिंचन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर 18 प्रकल्प 75 टक्क्यांच्यावर आहेत. तर 22 प्रकल्पामध्ये 75 पेक्षा कमी जलसाठा आहे. 35 प्रकल्पामध्ये 50 टक्केपेक्षा कमी जलसाठा आहे. तर 28 प्रकल्पामध्ये 25 टक्के पेक्षा कमी तर 13 प्रकल्पात ज्योत्याच्या खाली जलसाठा आहे.
जिल्ह्यात तालुक्यानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे.
धाराशिव 679.80 मीमी, तुळजापूर 875.10 मीमी, उमरगा 749.20 मीमी, लोहारा 750.70 मीमी, कळंब 750 मीमी, भूम 776.40 मीमी, वाशी 778.30 मीमी तर परंडा 622.60 मीमी याप्रमाणे जिल्ह्यात पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची ही टक्केवारी 97.02 टक्के आहे.

