धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय कामाचे टेंडर मिळवून देतो आणि त्यातील अडचणी दूर करतो, असे सांगून एका महिलेची 7 लाख रूपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यावर आरोपीने महिलेला शासकीय कामात अडथळा आणण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी साताऱ्यातील एका व्यक्तीवर धाराशिवच्या आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रयास उर्फ शंभुराजे दत्तात्रय भोसले (रा. होळ, ता. खटाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मनिषा बालाजी वाघमारे (वय 33, रा. न्यू रामनगर, सांजा चौक, धाराशिव) यांनी 4 ऑगस्ट 2025 रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मनिषा वाघमारे यांची ओळख आरोपी प्रयास भोसले याच्याशी झाली होती. 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हॉटेल ब्ल्यु टोकाई, पुणे आणि नंतर न्यू रामनगर, धाराशिव येथे आरोपीने मनिषा यांच्याकडून शासकीय टेंडरमधील व्यावसायिक अडचण दूर करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली.
दोन महिन्यांसाठी 7 लाख रूपये रोख रक्कम घेवून, त्याबदल्यात 10 लाख रूपये परत देतो, असे आमिष आरोपीने दाखवले. यावर विश्वास ठेवून मनिषा यांनी त्याला 7 लाख रूपये दिले. मात्र मुदत उलटून गेल्यानंतरही आरोपीने पैसे परत केले नाहीत. मनिषा यांनी पैशासाठी तगादा लावल्यावर आरोपीने त्यांना शासकीय कामात अडथळा आणू आणि जीवे ठार मारू अशी धमकी दिली. अखेर या त्रासाला कंटाळून मनिषा वाघमारे यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रयास भोसले विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316 (2), 318(4), 351(2) आणि (3) अन्वये फसवणूक आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.