धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संपूर्ण जिल्हाभरात शंभर आरोग शिबीर, शंभर जनता दरबार आणि प्रत्येक तहसील कार्यालयात रोजगार निर्मित्ती योजनांच्या अंमलबजावणीकरिता इच्छुकांसाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील तब्बल 910 कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जोपासली. हाच वारसा पुढे कायम ठेवत वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी पुढील वर्षभरात तेरणा जनसेवा केंद्राच्या सहकार्याने 100 आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातुन गोरगरीब कुटुंबांतील रुग्णांना मोठा दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. मोफत तपासणीसह निःशुल्क उपचार त्यानिमित्ताने जिल्हाभरातील गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरात तपासणीदरम्यान आढळून आलेल्या गंभीर आजारांची तातडीने दखल घेऊन मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत.

आरोग्य शिबिरांसोबतच पुढील शंभर दिवसात तब्बल 100 जनता दरबार जिल्हाभरात आयोजित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या या जनता दरबाराची माहिती त्या- त्या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रशासकीय पातळीवरील अडीअडचणींची जागेवर सोडवणूक करण्याचा प्रयत्न या जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन मा. देवेंद्रजी यांच्या वाढदिवसानिमीत्त 2022 मध्ये 'आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर धाराशिव' हा उपक्रम आपण सुरु केला होता. या अंतर्गत रोजगार निर्मीती योजनांच्या माध्यमातुन कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करण्यात येते. सदर योजना युवक युवतींसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून कर्जाच्या एकूण रक्कमेत महिलांना 35 टक्के व पुरुषांना 25 टक्के अनुदानही मिळते. या माध्यमातून हजारो युवक युवतींनी बँकेकडून कर्ज प्राप्त करून स्वत:चा नवा व्यवसाय सुरु केला आहे किंवा चालू व्यवसायात लक्षवेधी वाढ केली आहे. त्यामुळे या उपक्रमामध्ये आणखी युवक युवतींना सहभागी करुन घेण्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयात रोजगार निर्मिती योजनेंतर्गत नोंदणी शिबीरे आयोजीत करण्याचा संकल्पही या वाढदिवसाच्यानिमीत्त करण्यात आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.


 
Top