भूम (प्रतिनिधी)- भूम येथील संस्कार बालक मंदिर च्या वतीने दि. 4 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर, अशा विठ्ठलमय वातावरणात शहरातील संस्कार बालक मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला.
विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा तर कोणी रुक्मीणी बनले होते. हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुले- मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली या रूपात विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी शाळे मध्ये अवतरले होते. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना पंढरपूर अनुभवण्यासाठी शाळेतच दिंडी सोहळा आयोजित केला गेला होता. हा बालगोपाळांचा सोहळा साजरा करण्यासाठी संस्कार बालक मंदिरच्या संचालिका शीला पाठक, सारिका डोंबाळे, प्रिया क्षीरसागर, प्रगती पोतदार, सेजल सुरवसे, स्वरूपा वेदपाठक यांनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.