भूम (प्रतिनिधी)- भूम आगारा जवळील इंडिया बॅटरी ॲन्ड ऑटो इलेक्ट्रिशियन या दुकातून दि. 21 जुलै रोजी पहाटे 3. 30 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कटवनीच्या साह्याने शटर तोडून अंदाजे दीड लाख रुपये पर्यत किमतीच्या नवीन बॅटरी व बॅटरीच्या स्क्रॅपचे सहित्य चोरट्याने लंपास केले आहे. यामुळे शहरात व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस कर्मचाऱ्यानी घटना स्थळी भेट दिली.
अधिक माहिती अशी की दि. 21 जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजल्याच्या नंतर येथील भूम नगर मार्गावरील भूम आगारांसमोरील बाजूस मुबारक शेख यांचे इंडिया ॲन्ड ऑटो इलेक्ट्रिशियनचे दुकान चोरट्यांनी दुकानाबाहेरील लावलेल्या बल्बच्या दोन्ही वायर एकमेकांना जोडून शॉर्टसर्किट करून मेन पावर सप्लाय बंद केला. त्यामुळे संपूर्ण लाईट बंद होऊन सर्व सीसीटीव्हीचे कॅमेरे बंद पाडून, चोरट्यांनी नवीन चार चाकी, दोन चाकी व मोठ्या गाड्यांच्या बॅटऱ्या व बॅटऱ्याचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. यामध्ये मुबारक शेख यांचे अंदाजे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
जून महिन्यामध्ये भूम येथील येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मधील रक्कम चोरट्यांनी दरोडा टाकून चोरून लंपास केली होती. त्यानंतर भूम आठवडे बाजारामध्ये दुचाकी सतत चोरीला जात आहेत. त्यातच आज शहरांमध्ये असणाऱ्या बॅटरीच्या दुकानामधून बॅटरी व साहित्य चोरीला गेल्याने भूम येथील पोलीस प्रशासना समोर चोरट्यांनी आवाहन उभे केले आहे.