भुम (प्रतिनिधी)- ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन धाराशिव येथे संपन्न होणार आहे. हे अधिवेशन शनिवार दिनांक 19 व रविवार दिनांक 20 रोजी आयोजित केले आहे. धाराशिव येथील सोलापूर -धुळे महामार्गावरील सांजा उड्डाण पुलाजवळील श्री गणेश मंगल कार्यालय येथे या अधिवेशाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्राहक कल्याण क्षेत्रात राज्यात मोलाची कामगिरी बजावत आलेल्या व ग्राहक तीर्थ स्व. बिंदू माधव जोशी यांनी स्थापित केलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे राज्यस्तरीय अधिवेशनाचा लाभ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व निमंत्रितानी घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायतचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ विजय लाड यांनी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवार दिनांक 18 रोजी केले आहे. यावेळी राज्यसचिव अरुण वाघमारे, राज्य सह संघटक श्रीमती मेधाताई कुलकर्णी, मराठवाडा विभाग संघटक हेमंत वडणे, धाराशिव जिल्हाध्यक्ष अजित बागडे , जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे,जिल्हा सचिव आशिष बाबर यांच्यासह पदाधिकारी हजर होते.19 व 20 जुलै ला दोन दिवसीय भव्य अधिवेशन प्रथमच आयोजित करण्याचा बहुमान धाराशिव जिल्ह्याला मिळालेला आहे. मराठवाड्यात आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये स्नेह मेळावा,चर्चासत्र, प्रबोधन, तज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे संवाद उपक्रम, गुणवंत, यशवंतांचां गौरव, सहभागी सर्वांना प्रमाणपत्र, ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या से-वेची माहिती, मनोगते, आढावा आणि भविष्यातील सेवा कार्याचे नियोजन आणि समारोपीय सोहळा संपन्न होणार आहे.या अधिवेशनाचे उदघाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार करणार आहेत. हा कार्यक्रम ग्राहक पंचायतचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय जोशी ,आमदार कैलास पाटील,आमदार राणाजगजितसिंह पाटील,सोलापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे हे उपस्थित असणार आहेत. या अधिवेशनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या दोन दिवसीय अधिवेशनासाठी राज्यातील 23 जिल्ह्यांमधील 400 कार्यकर्ते हजर राहणार आहेत.