तुळजापूर (प्रतिनिधी)- टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पस येथे नुकतीच पर्जन्य मापक यंत्राची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील हवामान अभ्यास, पर्जन्यमानाचे अचूक मापन, जलस्रोत नियोजन आणि शैक्षणिक संशोधनाच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा  तुळजापूर कॅम्पस येथे पार पडला. यावेळी कॅम्पस संचालक प्रा. बाळ राक्षसे, सामाजिक कार्यकर्ते गणेश चादरे, आनंद भालेराव, शंकर ठाकरे आणि सचिन भालेकर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रो. बाळ राक्षसे यांनी सांगितले की, “ तुळजापूर कॅम्पस ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असल्यामुळे येथे हवामान अभ्यासासाठी पर्जन्य मापक यंत्र अत्यावश्यक होते. हा उपक्रम केवळ एक उपकरण स्थापन करण्यापुरता मर्यादित नसून, तो शाश्वत विकास, पर्यावरणीय साक्षरता आणि विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरणार आहे. भविष्यात हा कॅम्पस ‌‘पर्यावरण शिक्षणाची प्रयोगशाळा' व ‌‘हवामान सशक्त कॅम्पस' म्हणून ओळखला जाईल.”

या यंत्रामुळे दररोजचा पर्जन्यमान डेटा संकलित करता येणार असून तो डेटा शेती नियोजन, जलव्यवस्थापन, संशोधन आणि स्थानिक प्रशासन यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे श्री. गणेश चादरे यांनी सांगितले. “आजच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अचूक पर्जन्य मापन ही काळाची गरज बनली आहे. यामुळे केवळ शैक्षणिक उद्दिष्टच नव्हे, तर प्रत्यक्ष ग्रामविकासालाही हातभार लागणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुळजापूर कॅम्पस मधील हा उपक्रम म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन, तांत्रिक उपकरणांचा वापर आणि ग्रामीण वास्तव यांचा सुसंवाद साधणारे उदाहरण आहे. पर्जन्य मापक यंत्राची ही स्थापना हवामान बदलाशी लढण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणी व्यवस्थापनात प्रभावी मदत करणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गणेश चादरे, आनंद भालेराव, शंकर ठाकरे आणि सचिन भालेकर यांनी विशेष योगदान दिले.

 
Top