उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे तिन ठिकाणच्या रथ पालखी व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुरुवार दि. 10 रोजी सायं 4:30 वाजता देवस्थानच्या पायथ्याशी गोल रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी औराद शहा येथील घोडा, पादुका रथ पालखी सोहळा प्रथम आळंदी ते पंढरपूर पायी चालत पार पडला. पंढरपूर येथून औराद शहा. येथे येऊन पुढे तिनं दिवस पायी रथ पालखी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान कडे रवाना झाली आहे. 

बुधवार दि. 9 रोजी निलंगा ते दादगी लिंबाळा मार्गे भुतमुगळी करून तब्बल 22 किमी अंतर पार करून हासोरी मुक्कामी आली आहे. तेथे हभप. विठ्ठल महाराज दिवेगावकर यांनी किर्तन सेवा केली आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे गुरूवार दि. 10 रोजी सकाळी हासोरी येथून कासार शिर्शी मार्गे उमरगा तालुक्यातील कुन्हाळी, ञिकोळी, मुळज येथे दुपारी विसावा नंतर तुरोरी येथे कर्नाटक राज्यातील एकंबा गावातील पालखी एकञ येऊन गुरू पालखी भेट होऊन देवस्थान च्या पायथ्याशी रिंगण सोहळा ठिकाणी सायं. 4:30 वा. पोहचणार आहे. 

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील एकंबा गावातील सदगुरू उज्वलानंद महाराज यांची पादुका पालखी ही गुरूवार दि. 10 रोजी सकाळी निघून लाडवंती, उजळंब सह महाराष्ट्र राज्यातील उमरगा तालुक्यातील मळगी, चिंचकोट कोळसूर मार्गे तुरोरी येथे येऊन निलंगा तालुक्यातील औराद येथून येणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. तेथून एकञ सोबत देवस्थान पायथ्याशी रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहे.  कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील नवचंदवाडी येथील पादुका पालखी पायी सोहळा हा जोगेवाडी, मदारवाडी, उजळंब, एकंबा, फुलदरवाडी, होन्नाळी, हंद्राळ आर, चिट्टा, उर्की, आलगुड, वडरगा, भोसगा, वडरगा, कांबळेवाडी, मन्नाळी, चेंडकापूर, घोटाळ मार्गे उमरगा तालुक्यातील जगदळवाडी, थोरलीवाडी, धाकटीवाडी, हिप्परगा तलमोड मार्गे राष्ट्रीय महामार्गालगत पायी प्रवास करीत श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी सायं. 4:30 वा. पोहचणार आहे. 

देवस्थानच्या पायथ्याशी राष्ट्रीय महामार्गालगत गोल रिंगण सोहळ्यासाठी मैदान तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पालखी ठेवण्यासाठी स्टेज व स्पिकरची व्यवस्था करण्यात आली आहे. रिंगण सोहळा संपन्न होताच हभप. ज्ञानदेव गुरूजी हालसी यांचे प्रवचन नंतर सायं. 7 ते 9 या वेळी देवस्थानचे हभप. हरी गुरूजी लवटे महाराज यांचे किर्तन सेवा तसेच आषाढी वारीची सांगता होणार आहे. या सोहळ्याला दोन्ही राज्यांतील भाविक भक्तांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवत घोड्यांचे गोल रिंगण व किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top