भूम (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांची दुभती जनावरे घेऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना भूम पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शेतकऱ्यांची जनावरे खरेदी करून लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या बार्शी येथील दोघा आरोपींना भूम पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी तिसऱ्या आरोपीचा देखील तपास सुरू केला असून, आरोपींनी इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही गंडवले असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील शेतकरी नामदेव राजाभाऊ गाढवे (वय 32) हे शेती व दुध व्यवसाय करतात. 21 सप्टेंबर 2024 रोजी बार्शी येथील चंदन सुरेश मनगिरे (रा. मनगिरे मळा, बार्शी) व काका साळुंखे (रा. बायपास रोड, बार्शी) यांनी गाढवे यांच्या शेतात भेट देऊन दुभत्यांची विचारपूस केली. त्यांनी तीन गाई खरेदी करण्याचा सौदा 2,36,000 रुपयांत ठरवला. इसारापोटी फक्त 10,000 रुपये दिले गेले, आणि उर्वरित रक्कमेसाठी चंदन मनगिरे यांनी हर्ष टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पुणे या संस्थेच्या नावाने 2,25,000 रुपयांचा चेक दिला. मात्र, सदर चेक भूम येथील उस्मानाबाद जनता सहकारी बँक, शाखा भूम बँकेत भरल्यानंतर बँकेने ‌‘खाते बंद आहे' असे उत्तर दिले. फसवणूक लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने चंदन मनगिरे यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला पैसे देण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु नंतर आरोपींनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी भूम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी चंदन मनगिरे, काका साळुंखे आणि चंदू सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी सतत पोलिसांना गुंगारा देत होते. पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सरवदे, कॉन्स्टेबल भोईटे व होमगार्ड नाना वीर यांनी बार्शी येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना भूम येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांकडून आरोपींनी आणखी किती शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने फसवले याचा तपास सुरू असून, शेतकऱ्यांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 
Top