तुळजापूर (प्रतिनिधी)-  सप्टेंबरमध्ये साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक बुधवार दि. 23 जुलै रोजी पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

नवरात्र महोत्सवात दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात. यावर्षीही मोठी गर्दी लक्षात घेऊन आरोग्य, स्वच्छता, वाहतूक, वीज, पाणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. आरोग्य विभागाकडून यंदा अधिक प्रथमोपचार केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून, आपत्कालीन रुग्णवाहिकांची संख्या वाढवली जाईल. भाविकांची आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने भाविकांसाठी शहरात पुरेशा प्रमाणात शौचालये, पाणपोया आणि कचरा व्यवस्थापन यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता मोहीमेस विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भाविकांना शुद्ध, स्वच्छ आणि ताजे अन्न मिळावे यासाठी हॉटेल व्यवसायिकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अवैध प्रवासी वाहतूक व जुनी, अपायकारक वाहने यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलीस विभागाकडून गर्दी नियंत्रणासाठी शहरात विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असून, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. 

या आढावा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे महंत व पुजारी मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


 
Top