धाराशिव (प्रतिनिधी)- ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण होणे ही काळाची गरज आहे.ग्राहक हा फक्त खरेदीदार नसून तो देशाचा जबाबदार नागरिकही आहे.त्याला योग्य ती सेवा,शुद्ध माल,योग्य दर व मोजमाप मिळाले पाहिजे. आरोग्यास हानीकारक वस्तू विकत असताना दुकानदाराने त्या वस्तूंचे संभाव्य दुष्परिणाम ग्राहकाला स्पष्टपणे सांगावेत,अशी सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक श्री.पुजार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

 यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम गोडभरले,अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप कुटे,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे, वैधमापनशास्त्र अधिकारी अशोक पवार, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पवार व तहसीलदार अभिजित जगताप आदी उपस्थित होते.

पुजार पुढे म्हणाले की,ग्राहकांना त्यांच्या हक्काची आणि दर्जेदार सेवा मिळावी,तसेच कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये,यासाठी प्रत्येक विक्रेत्याने आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिक सेवा द्यावी,असे स्पष्ट मत श्री.पुजार यांनी व्यक्त केले. 

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी पेट्रोल पंपांबाबत विशेष नाराजी व्यक्त केली.काही पेट्रोल पंपांवर स्वच्छतेचा अभाव आहे, तसेच ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा, स्वच्छतागृह,पिण्याचे पाणी यांचा अभाव जाणवतो अशा पंपांना नोटिसा बजावण्यात येतील आणि सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल,असेही त्यांनी सांगितले. ग्राहक संरक्षण संदर्भातील तक्रारी तत्काळ निवारण होणे आवश्यक आहे,यावर सर्वांची सहमती दर्शवण्यात आली.अन्न धान्य वितरण,किरकोळ व्यापार,इंधन वितरण, औषधे व वैद्यकीय सेवा या सर्व क्षेत्रात ग्राहकांच्या तक्रारींचे गांभीर्याने निवारण व्हावे,असे निर्देश दिले.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून दरमहा नियमित बैठक घेऊन ग्राहकांच्या समस्यांचा आढावा घेण्यात यावा,अशी सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात यावेत,असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या बैठकीत ग्राहक संरक्षण अधिनियमाचे प्रभावी अंमलबजावणी,फसवणुकीच्या प्रकरणांवरील कारवाईचा आढावा,ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कामकाज,तसेच जिल्ह्यातील दुकानदार व सेवा पुरवठादारांवर केलेल्या तपासण्या याबाबत सविस्तर चर्चा झाली.ग्राहक हक्क,दर्जेदार सेवा,आणि प्रामाणिक व्यवहार यासंबंधी जनजागृती होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड, अन्नसुरक्षा अधिकारी गणेश दत्तू रोहित बंदी,बीएसएनएलचे अधिकारी सुहास यत्नाळकर,आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक महेश रायबान,पोलीस निरीक्षक ए.टी.चिंतले,ग्राहक पंचायतीचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप प्रतिनिधी,व्यापारी संघटना आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 
Top