धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा-241 (महा) मतदारसंघात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान तालुक्यातील विविध गावांच्या मतदार यादीत बोगस मतदारांची नावे जाणूनबुजून समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. साधारण सहा हजारांपेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयुक्ताकडे या अनुषंगाने पत्राद्वारे कळविले होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पत्राची केंद्रीय निवडणूक आयोग निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे

या संदर्भात 17 ऑक्टोबर 2024 रोजी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद शंकर बोळंगे यांनी संबंधित प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये (सेक्शन 172, 3(5), 318(2), 335, 336(2), 336(3), 340(2), 61(2), 62) तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणातील तपास अधिकारी तसेच पोलीस उपअधीक्षक देशमुख यांनी राजकीय दबावामुळे किंवा जाणूनबुजून आरोपींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने याची थेट तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती

या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामुळे भारतीय लोकशाहीची पायाभूत मूल्ये धोक्यात येत असल्याचे नागरिकांचे मत आहे. बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्याच्या कारस्थानामुळे लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा कृत्यांना प्रोत्साहन मिळण्याचा धोका असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील जबाबदार आरोपींवर तसेच तपासात जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लोकशाहीला कलंकित करणाऱ्या या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या बोगस मतदार नोंदणीवर केंद्रीय निवडणूक आयोग काय काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अशी बोगस मतदार नोंदणी करणाऱ्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.


 
Top