उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी तिन ठिकाणच्या घोडा, रथ, पालखी व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत गुरुवार दि. 10 जुलै रोजी सायं 5 वाजता गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. 

महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी औराद शहा येथील घोडा, पादुका रथ पालखी सोहळा प्रथम आळंदी ते पंढरपूर पायी चालत पार पडला. पंढरपूर येथून औराद शहा येथे येऊन पुढे तिनं दिवस पायी रथ पालखी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानकडे रवाना झाली आहे. मंगळवार दि. 8 जुलै रोजी सकाळी औराद शहा येथून पायी दिंडी सोहळा सुरू झाला होता. निलंगा, कासार शिर्शी, तुरोरी मार्गे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आली. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील एकंबा गावातील सदगुरू उज्वलानंद महाराज यांची पादुका पालखी ही गुरूवार दि. 10 जुलै रोजी सकाळी निघून मळगी, चिंचकोट कोळसूर मार्गे तुरोरी येथे येऊन निलंगा तालुक्यातील औराद येथून येणाऱ्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन, रिंगण सोहळ्यात सहभागी झाले आहेत.  

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील नवचंदवाडी येथील पादुका पालखी पायी सोहळा हा जोगेवाडी, उजळंब, एकंबा, होन्नाळी, हंद्राळ आर, चेंडकापूर, घोटाळ मार्गे उमरगा तालुक्यातील तलमोड मार्गे राष्ट्रीय महामार्गालगत पायी प्रवास करीत श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी सायं. 4:30 वा. पोहचली होती.देवस्थानच्या पायथ्याशी राष्ट्रीय महामार्गालगत गोल रिंगण सोहळ्यासाठी मैदान तयार करण्यात आले होते. या ठिकाणी पालखी ठेवण्यासाठी स्टेज व स्पिकरची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्याला दोन राज्यांतील आठ जिल्ह्यांतील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पार पडला.

 
Top