धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, भुयारी गटार अशा मूलभूत सुविधा देताना राजकीय कुरघोडीचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अश्या सूचना आमदार कैलास पाटील यांनी आढावा बैठकीत दिल्या.
आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक दि. 24 जुलै रोजी पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांनी नागरी समस्याकडे गांभीर्याने पाहण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, तहसीलदार मृणाल जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक, प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांबाबत आमदार पाटील म्हणाले, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. 140 कोटीच्या कामाची फेरनिविदेची प्रक्रिया सुरु होण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, दुसरीकडे नियोजन समितीच्याही कामाना स्थगिती आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून त्याबाबत पाठपुरावा करावा अश्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या. राजकीय कुरघोडी करताना जनतेचे हाल होणार नाहीत याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असं आमदार पाटील यांनी सांगितले.
काम न करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका
शहरातील पथदिव्यांचा दुरुस्ती करणे हे नगरपालिकेचे काम आहे. कंपनी व त्याचा करार ही कारणे किती दिवस जनतेला सांगणार आहात? सण उत्सवाच्या दिवसात शहरात अंधार होणार नाही यासाठी पालिकेच्या स्तरावर दिवाबत्ती खरेदीची सोय करावी. तुंबलेल्या गटारी, नालेसफाई होत नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. नालेसफाईचे काम या कंपनीला होत नसेल तर त्याच्याकडून हे काम काढून घेऊन नवीन कंत्राट काढा. कचरा डेपोबाबतही पालकमंत्री यांची सुचना अंमलात आणा. जे ठेकेदार काम करणार नाहीत त्या ठेकेदारांना काळ्या यादी टाका असे आदेशही आमदार कैलास पाटील यांनी दिले.