भूम (प्रतिनिधी)-  शेतामधील मुरुमाचे अवैध उत्खनन करून ते चोरून नेण्याला आक्षेप घेतल्याच्या कारणावरून एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार भुम तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात भुम पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी दत्तात्रय साठे (वय 36, रा. साठे नगर, भूम) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 13 जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भुम येथील अलमप्रभु देवस्थानच्या पाठीमागे असलेल्या शेत सर्व्हे क्रमांक 243/अ/1 मध्ये घडली. फिर्यादी अश्विनी साठे यांच्या शेतातून आरोपी संदीप लष्कर आणि शिवशंकर हे दोघे मुरुमाचे उत्खनन करून अतिक्रमण करत होते. यावेळी अश्विनी यांचे पती दत्तात्रय साठे यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी त्याचा राग मनात धरला. त्यानंतर आरोपींनी अश्विनी साठे यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने 25 जुलै रोजी भूम पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी आरोपी संदीप लष्कर व शिवशंकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
Top