धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक आणि प्राचीन पर्यटनस्थळांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे शक्तिपीठ आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या भक्तिपीठाचे त्याला मोठे आशीर्वाद लाभलेले आहेत. पर्यटन विकासाच्या माध्यमातून आपण रोजगार निर्मितीला प्रथम प्राधान्य देत आहोत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांचा एकत्रित प्रारूप आराखडा 20 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे 'मित्र' चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
नळदुर्ग येथील किल्ला व सभोवतालच्या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर करत विकास साधला जाणार आहे. तसेच बसवसृष्टी व वसंतराव नाईक स्मारकासह इतर बाबींचा विचार करून ' रोप-वे', ' हॉट एअर बलून' यासारख्या साहसी क्रीडा प्रकारांचा देखील या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. येडशी येथील रामलिंग अभयारण्यासह श्री क्षेत्र रामलिंग मंदिर व परिसराचा विकास, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला दुर्गादेवी डाक बंगला, जुनी रेल्वेलाईन व स्टेशन तथा जुने विठ्ठलवाडी गाव मूळ ऐतिहासिक रूपात पुन्हा एकदा नव्याने साकारण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ख्याती असलेल्या श्री क्षेत्र आई येडेश्वरी देवीमंदिर परिसरात आवश्यक भूसंपादनासह एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राचीन 'तगर'चा इतिहासाला असलेली वैभवशाली प्राचीन झळाळी पुन्हा एकदा यानिमित्ताने मिळणार आहे. राज्यातील सर्वात प्राचीन मंदिर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
या बैठकीस तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार अभिजित जगताप, पर्यटन विभागाच्या जया वहाने, सल्लागार नेहा शितोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.