भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील ओंकार चौक येथे 17 जुलै 2025 रोजी घडलेल्या वाहन अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता व ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गतीरोधक योग्यरित्या रंगवला नसल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
फिर्यादी श्याम शिवाजी काळे (वय 28, व्यवसाय शेती, रा. सोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) हे त्यांच्या स्विफ्ट गाडीने सीएनजी भरण्यासाठी निघाले असता, ओंकार चौक येथील गतीरोधक अचानक समोर आल्याने त्यांनी गाडीचे ब्रेक दाबले. यामुळे मागून येणाऱ्या गाडी (क्रमांक एम.एच.45 ए.डी.9569) ने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. या घटनेत गतीरोधक योग्यरित्या दिसत नसल्यामुळे अपघात झाला असल्याचे म्हणत त्यांनी तक्रार दाखल केली.
त्यावरून भूम पोलीस स्टेशन येथे शाखा अभियंता (नाव अज्ञात), ठेकेदार (नाव अज्ञात) व गाडी चालक राहुल किरण शहा (रा. मोडलिंब, ता. माढा, जि. सोलापूर) यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक 155/2025 अन्वये 2023 च्या कलम 285, 281, 324(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत शहरातील नागरिकांमध्ये मिश्र भावना आहेत. सदरील रस्ता ओलांडून रवींद्र हायस्कूल, श्री गुरुदेव हायस्कूल व बहुतांश खाजगी क्लाससाठी जाणारे विद्यार्थी आहेत. त्यामुळे गतिरोधक आवश्यक होते. त्यामुळे लाखो रूपये खर्च करणाऱ्या बांधकाम विभाग गतीरोधक ठळक दिसावे यासाठी काय उपाययोजना केल्या असा प्रश्न उपस्थित केला जाता आहे.