धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांना दि.30.06.2025 गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहरातील खिरणीमळा भागातुन वैराग नाका रोडने गोवंशीय जनावरांचे मांस पिकअप मध्ये भरुन विक्रीसाठी घेवून जाणार आहे. अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पथकाने नमुद ठिकाणी जावून थांबले असता पथकास 20.30 वा. सु एक पिकअप क्र एमएच 25 6495 हा रसुलपुरा ते वैराग नाका जाणारे रोडवर मुलींचे शासकीय वस्तीगृहाचे समोरुन जाताना दिसल्याने पथकाने त्यास थांबण्यास सागिंतले. टेम्पोतून दुर्गंधयुक्त पाणी गळत असल्याने पथकाने संशयावरून टेम्पोचे पाठीमागे हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय जनावराचे मांस दिसून आले. त्यावर पथकाने पिकअप चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव- मोईनउद्दीन उमर शेख, वय 37 वर्षे रा. फकीरानगर, वैराग रोड, धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले. पथकाने नमूद पिकअप चालकास मांसा बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, सदरचे गोमांस हे जावेद नुरमहमद कुरेशी रा. पापनाश ता. माढा जि. सोलापूर ह.मु. खिणीमळा धाराशिव याचे असल्याचे सांगितले. यावर पथकाने अंदाजे 8,00,000 किंमतीच्या नमूद पिकअपसह त्यातील अंदाजे 6,00,000 रूपये किंमतीचे सुमारे 3,000 किलो गोवंशीय जनावरांचे मांस जप्त केले. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार- सुधीर मुगळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस हावलदार पठाण, चव्हाण, पोलीस अंमलदार मुगळे, कनामे, जमादार, चालक पोलीस हावलदार नागरगोजे यांच्या पथकाने केली आहे.