धाराशिव (प्रतिनिधी)- भावाचे नाव गुन्ह्यातून कमी करून देतो असे म्हणत 4 लाख रूपयांची लाच मागणाऱ्या पोलिस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. मोबीन नवाज शेख (वय 41) याच्याविरूध्द धाराशिव शहर पोलिस ठाण्या भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल असताना, त्यांच्या भावाचे नाव वगळण्यासाठी मोबीन शेख याने सुरूवातीला 5 लाखांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम 4 लाख रूपये निश्चित करण्यात आली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून 17 जून रोजी पोलिस स्टेशन धाराशिव शहर आवारात पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार, त्याचे वडील व भाऊ यांचे विरूध्द पोलिस ठाणे धाराशिव शहर येथे दाखल गुन्ह्यातून भावाचे नाव कमी करण्यासाठी तडजोडीअंती 4 लाख रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले आहे. यातील आरोपी लोकसेवक यांने लाच रक्कम मागितली मात्र स्विकारली नाही.
आरोपीच्या घर झडतीसाठी त्याचे रहाते घरी पथक तत्काळ रवाना करण्यात आलेले आहे. घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. आलोसे यास ताब्यात घेवून त्याचेविरूध्द धाराशिव शहर पोलिस स्टेशन येथे कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. तपास अधिकारी व लाच मागणी अधिकारी बाळासाहेब नरवटे पोलिस निरीक्षक, सहायक लाच मागणी पडताळणी अधिकारी विजय वगरे पोलिस निरीक्षक यांनी काम पाहिले. लाच मागणी पडताळणी पथकात पोना अशिष पाटील, विशाल डोके, सिध्देश्वर तावसकर होते. मार्गदर्शन अधिकारी माधुरी केदार कांगणे पोलिस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, पर्यवेक्षण अधिकारी योगेश वेळापुरे पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांनी काम पाहिले.