धाराशिव (प्रतिनिधी)- राजकारणात आम्ही तुमचे विरोधक आहोत म्हणून तुम्ही इथल्या जनतेवर का अन्याय करता आहात असा प्रश्न विचारत जो राग आहे तो आमच्यावर काढा असं खुलं आव्हान आमदार कैलास पाटील यांनी सरकारला दिले. ते सभागृहात नगरविकास विभागावर बोलत होते. 

यावेळी आमदार पाटील म्हणाले, नवीन सरकारचा शपथविधीच्या सोहळ्यात एक टॅगलाईन होती की महाराष्ट्र आता थांबणार नाही. धाराशिव शहरातील 140 कोटीतुन 59 रस्ते करण्याची निविदा प्रक्रिया गेल्या सतरा महिन्यापासून रखडली आहे. मग आता का महाराष्ट्र थांबला आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण न होण्यासाठी कोणाचा इंटरेस्ट आहे याची चौकशी झाली पाहिजे. शहरातील रस्ते खराब असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कोणाच्या इंटरेस्टमुळे नागरिकांना त्रास का? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी विचारला. 

जिल्ह्याचे जिल्हा नियोजन समितीचा 2024-25 च्या निधीला सरकारने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती का दिली याची चौकशी करावी यातही कोणाचा तरी इंटरेस्ट आहे का याचाही शोध घेणं गरजेचं आहे. राज्यात सर्वच जिल्ह्याला निधी दिला जात असताना आमच्या जिल्ह्यावर असा अन्याय का? विशेष म्हणजे आमचा जिल्हा हा आकांक्षित असून इथे अधिकचा निधी देण्याची गरज असताना आहे, वाढीव सोडा पण आहे तो देखील निधी मिळत नसेल तर जिल्ह्याचा विकास कसा होईल? मग इथं महाराष्ट्र कसा थांबला याचेही उत्तर सरकारने द्यावे असे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना धाराशिव शहरासाठी दोन उद्याने व एक आठवडी बाजारासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. पण सरकार गेल्यानंतर या निधीला स्थगिती देण्यात आली. बाकी सर्व विभागानी त्यांची स्थगिती उठवली पण नगरविकास विभाग अजूनही ती उठवायला तयार नाही. विशेष म्हणजे न्यायालयात मुख्य सचिव यांनी स्थगिती उठवू असे लेखी दिले आहे तरीही ही स्थगिती का उठवली नाही याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. शहरात एकही उद्यान नाही व आठवडी बाजारात चिखलात शेतकऱ्यांना बसावे लागत आहे. तुमचा राग आमच्यावर आहे पण तो जनतेवर का काढत आहात अशीही विचारणा आमदार पाटील यांनी केली. याचप्रमाणे जिल्हा क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅकसाठी देखील निधी मंजुरी मिळाली आहे. पण त्याचीही निविदा होत नसल्याने इथेही कोणाचा इंटरेस्ट अडकला आहे हे चौकशीतून बाहेर येईल त्यामुळे या सर्व गोष्टीची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top