कळंब (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे कांही महत्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत ते प्रश्न लवकर सोडवावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी (प्रा) नागेश मापारी यांना प्रत्यक्ष भेटून केले आहे.
प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र असलेल्या उर्वरित प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही करावी. जिल्ह्यात सध्या शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची जवळपास 80 पदे रिक्त आहेत ही रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत. वरिष्ठ वेतन श्रेणी फरक,वैद्यकीय देयके यासाठी आर्थिक तरतूद करून प्रलंबित देयके पारित करावीत. त्याबरोबरच सामान सेवा असलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षक व प्राथमिक शिक्षक यांच्या वेतनातील तफावत दूर करून प्राथमिक शिक्षकाप्रमाणे पदवीधर शिक्षकाला वेतन देण्यात यावे. या सर्व प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून प्रश्न सोडवण्याबाबत शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी मापारी यांनी निवेदनातील सर्व प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून पदोन्नतीचे आदेश शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर लगेच काढले जातील. इतर प्रश्न लवकरच सोडविले जातील असे सांगितले. यावेळी शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे, संतोष देशपांडे, शेषराव राठोड, धनाजी मुळे, दत्तात्रय पवार, उमेश भोसले, प्रदीप म्हेत्रे, राहुल भंडारे, अमरसिंह गोरे, महादेव मेनकुदळे, बालाजी दंडनाईक, नागेश कदम, श्रीकांत गरड, अरुण खराडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.