धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव येथील बसस्थानक परिसरात एका विभागीय स्थापत्य अभियंत्याने लाचेची मागणी करून ती पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाराशिव युनिटने ही यशस्वी सापळा कारवाई केली.

तक्रारदार, वय 36 वर्षे, व्यवसायाने गुत्तेदार असून त्यांना धाराशिव बसस्थानक परिसरात वाहनतळासाठी जागा वाटप करण्यात आली होती. त्या जागेचा ताबा देण्यासाठी आणि कँटीनशेजारील पार्किंगच्या शटरबाबत सुलभता निर्माण करण्यासाठी विभागीय स्थापत्य अभियंता शशिकांत अरुण उबाळे (वय 49, रा. अंत्रोळीनगर, सोलापूर) यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 5 हजार रुपये तात्काळ स्वीकारले, तर उर्वरित 10 हजारांची मागणी 18 जुलै 2025 रोजी करण्यात आली.

तक्रारीची खातरजमा करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 18 जुलै रोजी पडताळणी केली असता, उबाळे यांनी डीसी साहेबांसाठी 5 हजार आणि स्वतःसाठी 4 हजार अशी एकूण 9 हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारण्यास तयार असल्याचे पंचांसमोर कबूल केले. त्यानुसार आज, 22 जुलै 2025 रोजी, धाराशिव येथील बस स्थानक आवारात सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 9 हजार रुपये स्वीकारताना उबाळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत लाच रक्कम तसेच मोबाईल फोन आणि अन्य वस्तू मिळून आल्या असून त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

या कारवाईनंतर आरोपीच्या घरझडतीसाठी विशेष पथक सोलापूरला रवाना करण्यात आले असून तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक करून सखोल चौकशी केली जाणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव युनिटचे पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सापळा पथकात पोनि विजय वगरे, बाळासाहेब नरवटे, पोलीस अंमलदार तावसकर, हजारे, काझी यांचा समावेश होता. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सुरेश नाईकनवरे आणि पर्यवेक्षण अधिकारी योगेश वेळापुरे यांच्या देखरेखीखाली पार पडली. विशेष म्हणजे, ही घटना राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्ह्यातच घडल्याने शासन आणि परिवहन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

 
Top