धाराशिव (प्रतिनिधी)- “छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे खरे प्रणेते होते. शिक्षण हेच समाज उन्नतीचे साधन आहे,याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला,“ असे प्रतिपादन प्रमुख वक्ते भैरवनाथ कानडे यांनी केले.
सामाजिक न्याय भवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 26 जून रोजी आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ‘राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक विचार' या विषयावरील व्याख्यानात श्री.कानडे बोलत होते.
कानडे पुढे म्हणाले,सन “1917 साली शाहू महाराजांनी एक आदेश काढला की,त्यांच्या राज्यातील सर्व मुलांनी शिक्षण घेतलेच पाहिजे.हा निर्णय केवळ क्रांतिकारी नव्हता,तर तो पुढील अनेक दशकांमध्ये भारताच्या शैक्षणिक धोरणाची दिशा ठरवणारा ठरला.तेव्हा जातीभेद, अस्पृश्यता,आणि बहुजन समाजातील शिक्षणाची कमतरता ही मोठी समस्या होती.शाहू महाराजांनी या सगळ्या अडथळ्यांना छेद देत बहुजन,दलित,मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शाळा काढल्या, वसतिगृहे उभी केली, आणि शिष्यवृत्त्या सुरू केल्या.
“त्यांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन फक्त पुस्तकी शिक्षणापुरता मर्यादित नव्हता.त्यांनी तंत्रशिक्षण,व्यवसायिक शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले. मुलींना शिक्षणाची संधी देणारे ते पहिले राजे होते.त्यांचे हे कार्य आजच्या सरकारांनीही आदर्श मानले पाहिजे,“असेही श्री.कानडे यांनी सांगितले.
भैरवनाथ कानडे म्हणाले की, “1917 मध्ये शाहू महाराजांनी एक आदेश काढून राज्यातील सर्व मुलांसाठी शिक्षण अनिवार्य आणि मोफत केले.त्या काळात बहुजन समाज शिक्षणापासून दूर होता.शाहू महाराजांनी दलित,मागासवर्गीय व स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले.त्यांनी वसतिगृहे,शिष्यवृत्ती आणि शिक्षकांच्या नियुक्त्या करून शिक्षणाचा आधारभूत पाया घातला.” “आजही शिक्षणाच्या क्षेत्रात समता आणायची असेल,तर शाहूमहाराजांचे धोरण आणि दृष्टिकोन मार्गदर्शक ठरू शकतात.त्यांनी फक्त पुस्तकी शिक्षण नव्हे तर व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणालाही प्रोत्साहन दिले.”
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश अहिरराव,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री.बांगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.