धाराशिव (प्रतिनिधी)- महावितरण कंपनीमध्ये रिक्त पदाच्या जागेवर अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. हे कामगार नियमित कामगाराप्रमाणे महावितरणचे काम करतात.पण या कामगारांना नियमित कामगारांप्रमाणे न्याय मिळत नाही.म्हणून धाराशिव जिल्ह्यातील कंत्राटी कामगार अधीक्षक अभियंता कार्यालय धाराशिव येथे चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत.
अधीक्षक अभियंता संजय आडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर व व्यवस्थापक (मा सं) दिलीप पाटोळे यांच्या समवेत बैठक घेऊन वीज कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. पण काही प्रश्न अद्याप पर्यंत मार्गी लागले नाहीत. म्हणून अमरण उपोषण करावे लागत आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या तीन एजन्सी काम पाहतात. विद्युतसागर संस्था, अंबाजोगाई, मे.आकाश इलेक्ट्रिकल,बीड, मे.पटले कॉन्ट्रॅक्टर,नागपूर. या तीन एजन्सी मार्फत सध्या धाराशिव जिल्ह्याचा कंत्राटी कामगारांचा कार्यभार सांभाळला जातो. या वरील एजन्सी कडून कंत्राटी कामगारांची आर्थिक व मानसिक पिळवणूक केली जात आहे. याबाबत आम्ही प्रधान मालक म्हणून अधीक्षक अभियंता संजय आडे यांना वारंवार पत्र व्यवहार सुद्धा केलेलां आहे. तरी देखील प्रधान मालक यांच्याकडून वरील सर्व एजन्सीवर अंकुश ठेवण्यात येत नाही, असा आरोप सर्व कंत्राटी कामगारांचा आहे. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत.
कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे.- जुन्या, अनुभवी व न्यायालयीन संरक्षित कंत्राटी कामगारांना प्राधान्याने नियुक्ती आदेश द्यावे. वेतन वाढीतील फरक हा कामगारांच्या खात्यावर नोव्हेंबर 2024 मध्ये देण्याचे आदेश अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून देण्यात आले. तरी देखील काही कामगारांना अजूनही 19%पगारवाढीतील फरक मिळालेला नाही. जुन्या कामगारांना डावलुन नवीन कामगारांकडून वीस ते तीस हजार रुपये घेऊन गुत्तेदारांमार्फत त्या नवीन कामगारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत.व जुन्या कामगारांना कामावरून कमी केले आहे. सर्व कामगारांचे ईएसआयसी कार्ड कौटुंबिक माहितीसह मिळावे यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे.अजूनही कौटुंबिक माहितीसह ईएसआयसी कार्ड कामगारांना मिळालेली नाहीत. काही कामगारांचे साल 2022 व 2024 मधील वेतन थकीत आहे.ते वेतन आजुन पर्यंत मिळाले नाही. सेवाजेष्ठतेप्रमाणे वीज कंत्राटी कामगार कामावर ठेवण्यात यावेत. मुख्य अभियंता बुलबुले यांनी दिलेल्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांचे कामाचे ठिकाण व राहण्याचे ठिकाण यात 5 ते 7 किमी चे अंतर राहावे. वरील मागण्यात जर लवकरात लवकर मान्य करून न्याय नाही मिळाल्यास,जिल्ह्यातील सर्वच कंत्राटी कामगार या उपोषणासाठी अधीक्षक अभियंता कार्यालय, धाराशिव समोर बसतील. याची नोंद घ्यावी.