भूम (प्रतिनिधी)- सटवाई देवी ,माणकेश्वर (ता.भूम )येथे येणाऱ्या भाविक भक्तांना ,ग्रामस्थ ,परिसरातील व्यापारी व व्यवसायिकांना मंदिरात येण्या जाण्यास ,वाहन गाडी लावण्यास ,एकादशी केलेला अडथळा ,देवीपूजन व धार्मिक विधिवर लावण्यात आलेले प्रतिबंध त्वरित हटवण्यात यावा यासाठी दि. 7 जुलै पासून ग्रामस्थ व्यावसायिक यांचे आमरण उपोषण चालू आहे. 

माणकेश्वर तालुका भूम येथील प्रसिद्ध सटवाई देवस्थान हे संपूर्ण पंचक्रोशीतील तसेच राज्य बाहेरील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून ,सदर देवस्थान वर्षभर विविध सण ,नवस ,पूजा विधि यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर आवक -जावक असते. तसेच गावातील सर्व व्यापारी व्यवसाय यांचे उपजीविकेचे ते मुख्य साधन आहे . व गावची अर्थव्यवस्था या देवस्थानावर अवलंबून आहे. मंदिर परिसरातील व रस्त्यालगत अनेक दुकाने, खेळणी वाले ,खाद्यपदार्थ विक्रेते,हार फुले विक्रेते ,प्रसाद विक्रेते ,किराणा दुकानदार इत्यादींचा उदरनिर्वाह हा मंदिरातील भाविकांच्या उपस्थितीवर पूर्णत:अवलंबून आहे .सदर व्यवसाय शासनाच्या परवानगीने व देवस्थान मंडळाच्या सहमतीने चालवली जात आहेत .आणि त्यासाठी तलाठी ,माणकेश्वर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून महसूल देखील वसूल केला जातो .अशी वस्तुस्थिती असताना 12 जून पासून प्रशासनामार्फत पोलीस बंदोबस्त ठेवून परिसरातील नागरिकांना व भाविक भक्तांना मंदिर परिसरात ये जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे .तसेच मंदिराच्या संरक्षक भिंती असलेली तीन प्रवेशद्वारे कुलूप बंद ठेवण्यात आलेले आहेत .यामुळे व्यापाऱ्यांना ,भाविकांना ,ग्रामस्थांना परिसरात ये जा करण्यास ,धार्मिक विधी करण्यास अडथळा निर्माण झाला आहे .कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा न्यायालयीन आदेश नसताना दोन प्रवेशद्वार कुलूप लावून बंद करण्यात आले असून मंदिर परिसरात फेरीवाल्यांना तसेच परिसरातील टपरीधारकांना दुकाने उघडण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे .यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे .वाहनांना देखील प्रवेश बंद असल्यामुळे वाहने रस्त्यावर थांबत असून वाहतूक कोंडी होत .परिणामी ,गावातील आबाल वृद्धांच्या जीवितस अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेला कर्मचारी त्यांची मर्जीप्रमाणे अरेरावी करत असून ,लहान व्यापाऱ्यांना आणि अन्न व्यवसायिकांना -ज्याचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे -त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढावली आहे .सदर कृत्य हे बेकायदेशीर असून गावकऱ्यांच्या व भाविक भक्तांच्या मूलभूत अधिकारावर घाला आणणारे आहे .म्हणून देवस्थान परिसरात येजा करण्यास ,वावरण्यास ,वाहने नेण्यास ,व्यवसाय सुरू ठेवण्यास आणि धार्मिक विधी करण्यास लादण्यात आलेला प्रतिबंध त्वरित हटवण्यात यावा .यासाठी बाळासाहेब निमटके ,कैलास अंधारे ,शेषराव इचगज ,पंडित गटकुळ, महेश गुरव, विजय झोंबाडे , सचिन गुरव या व्यावसायिक व ग्रामस्थ यांचे उपोषण सुरू आहे.

 
Top